First Step

Learning to be a part of "Digital Writing"

Pages

Friday, 30 June 2017

बाबा

मी गरवारे मध्ये tourism चा course करत असताना एका प्रोजेक्ट च्या वेळी आम्हाला एक कुचिपुडी नर्तिकेचं आणि नृत्य करणाऱ्या गणपतीच चित्र काढून रंगावायचं होतं. कुठून जोश आला काय माहीत, पण दोन दिवस दोन रात्रींमधे ही दोन्ही चित्रं मी पूर्ण केली. आणि ती खूप सुंदर झाली होती, इतकी की त्यातलं गणपतीचं चित्रं एका प्रोफेसरनी मागून घेतलं. मला घरी आल्यावर आईने सांगितलं की एका exhibition साठी बाबांनी असच पूर्ण रात्र बसून शिवाजी महाराजांच रेखाचित्र काढलं होतं. मला ऐकून एवढी माजा वाटली!

गेले दोन तीन दिवस सतत Happy Father's Day चे messages FB वर फिरतायत. बाबांना जाऊन 20 वर्ष होऊन गेेली. त्यावेळी माझ्या आयुष्यात असलेल्या सगळ्या लोकांना बाबा माहीत होते. मोठी होत गेले तशी खूप नवीन लोक भेटले, अर्थातच त्यांना बाबा फक्त माझ्याकडूनच कळले.

कॉलेजमध्ये असताना एका मैत्रिणीच्या वडिलांनी मला आडनाव ऐकून "प्रकाश बर्वे तुझे कोण?" असा प्रश्न विचारला. ते माझे वडील हे ऐकल्यावर प्रसन्न हसले आणि म्हणाले "मी त्यांच्याबद्दल खूपच चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत माझ्या कामाच्या संदर्भात". कोणीतरी "झालं ते फार वाईट झालं" असं सोडून इतकी छान गोष्ट मला सांगितली. फार बरं वाटलं.

बरेचदा माझा नवरा, जवळचे मित्र मैत्रिणी मला म्हणतात की तुझ्याकडून बाबांबद्दल ऐकून त्यांना भेटायला मिळालं असतं तर मजा आली असती असं वाटत. त्यांना असं वाटत याचा मला आनंद होतो.

मला खूप मोठेपणीपर्यंत (म्हणजे gratuate होईपर्यंत) वाटायचं की ते अचानक येतील एक दिवस घरी. मग नंतर कळलं ते कधी कुठे गेलेच नव्हते... ते कायम इथेच आहेत, आमच्या सगळ्यांबरोबर...